भूगोल विषय

भूगोल माहिति
*************
👧🏻🌺🌅👦🏻🌅🌺
बुधाचे अधिक्रमण....

मे महिन्यात आगळेवेगळे ग्रहण दिसेल. अधूनमधून आपण चंद्र, सूर्याची ग्रहणे पाहतो. चंद्राप्रमाणे बुध आणि शुक्र हे अंतर्ग्रहदेखील सूर्याला ग्रहण लावू शकतात. मात्र, सूर्याच्या तुलनेत बुध, शुक्राच्या बिंबाचा आकार फार छोटा असल्याने या प्रकारची ग्रहणे नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. या खगोलीय आविष्कारास अधिक्रमण (ट्रांझिट) म्हणतात. ९ मे रोजी बुधाचे अधिक्रमण आहे. यानंतर बुधाचे अधिक्रमण २०१९ आणि २०३२मध्ये दिसेल. 

नुसत्या डोळ्यांनी अधिक्रमणे दिसत नसल्याने दुर्बिणीच्या शोधापूर्वी कोणीही ते पाहिले नव्हते. टॉलेमी आणि कोपर्निकस यांनी अधिक्रमणाविषयी भाकिते केली होती. खगोलविद केप्लरने ग्रहांच्या कक्षेची गणिते मांडून १६३१मधील बुध, शुक्राच्या अधिक्रमणाची शक्यता वर्तवली. केप्लरचे निधन झाल्यामुळे त्याला ही अधिक्रमणे पाहता आली नाहीत. फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ गॅसेंडीने मात्र केप्लरच्या भाकितानुसार नजर ठेवली. त्याला ७ नोव्हेंबर १६३१ रोजी बुधाचे अधिक्रमण पाहता आले. शुक्राचे अधिक्रमण मात्र त्याला दिसले नाही. यानंतर १६३९मध्ये झालेले शुक्राचे अधिक्रमण इंग्रज खगोलशास्त्रज्ञ जेरेमी हॉरॉक्स याने पाहिले. अधिक्रमणांची निरीक्षणे पृथ्वीवरील विविध ठिकाणाहून घेतल्यास सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर काढता येईल, असे एडमंड हॅलेने जाहीर केले होते. त्यानुसार शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या देशांत जाऊन, हालअपेष्टा सोसून, अधिक्रमणांची निरीक्षणे घेत सूर्य-पृथ्वीचे अंतर मोजले. 

पृथ्वीच्या आतील कक्षेतून सूर्य प्रदक्षिणा घालणाऱ्या बुध आणि शुक्राची अधिक्रमणे दिसतात. सूर्याभोवती फिरताना अंतर्ग्रह सूर्य व पृथ्वी यांच्या बरोबर मध्ये आल्यास अधिक्रमण घडते. बुध अवघ्या ४.६ कोटी किलोमीटर अंतरावरून ८८ दिवसांत सूर्य प्रदक्षिणा घालतो. तो पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये आल्यास अंतर्युती होते. मात्र, दर अंतर्युतीच्या वेळी तो सूर्यबिंबावरून जात नाही. याला कारण बुधाच्या कक्षेने पृथ्वी कक्षेशी केलेला ७ अंशांचा कोन. यामुळे अंतर्युतीच्या वेळी बुध सूर्यबिंबावरून न जाता सूर्याच्या शेजारून जातो. सामान्यतः ३३ अंतर्युतींपैकी एका युतीच्या वेळी तो बरोबर सूर्यबिंबावरून जातो. बुध आणि पृथ्वीच्या कक्षा जेथे एकमेकांना छेदतात, त्या स्थानास पातबिंदू म्हणतात. या पातबिंदूपाशी बुध पोहोचल्यास अधिक्रमण घडते. पृथ्वी या पातबिंदूबाशी १० नोव्हेंबर व ८ मे रोजी येते. त्याचवेळी तेथे बुध पोहोचल्यास अंतर्युतीवेळी अधिक्रमण घडते. साधारण दर ४६ वर्षांनी पुन्हा बुधाचे अधिक्रमण दिसते. नोव्हेंबरमध्ये अधिक्रमण झाल्यास ७, १३ किंवा ३३ वर्षांनी अधिक्रमण दिसते, तर मेचे अधिक्रमण १३ किंवा ३३ वर्षांनी दिसते. एका शतकात १३ अधिक्रमणे दिसतात. 

येत्या ९ मे रोजीचे अधिक्रमण अमेरिका, कॅनडा, युरोप, आफ्रिका व आशियात दिसेल. भारतात ते संध्याकाळी काही काळ पाहता येईल. हे अधिक्रमण भारतीय वेळेप्रमाणे संध्याकाळी ४.४० वाजता सुरू होऊन मध्यरात्री १२.०८ वाजता सुटेल. म्हणजेच बुध हा सूर्यबिंबावर सुमारे साडेसात तास असेल. बुधाचा छोटासा काळसर ठिपका सूर्यबिंबावरून ईशान्येकडून नैर्ऋत्येकडे जाताना दिसेल. अधिक्रमणावेळी सूर्यबिंब ३१ मिनिटे ७ सेकंदाचे दिसेल, तर बुध अवघा १२ सेकंदाच्या आकाराचा दिसेल. याचा अर्थ असा, की सूर्यबिंबापेक्षा बुध हा १५८ पट छोटा दिसेल. याचमुळे प्रखर तेजस्वी सूर्यबिंबावरचा बुधाचा छोटासा ठिपका डोळ्याने दिसणार नाही. भारतात अधिक्रमणाची सुरुवात दिसेल; मात्र संपूर्ण अधिक्रमण दिसणार नाही. साधारण अधिक्रमणाच्या मध्यापर्यंत सूर्य क्षितिजावर असल्यामुळे अधिक्रमण पाहता येईल. पश्चिम क्षितिजावरील संध्याकाळच्या धुरकटपणामुळे अधिक्रमण फार काळ दिसणारही नाही. 

नुसत्या उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे फार काळ पाहता येत नाही. दुर्बिणीतून सूर्याकडे पाहिल्यास डोळा जाऊ शकतो. त्यामुळे सूर्यबिंबाची प्रतिमा दुर्बिणीच्या साह्याने कागदावर घेऊन अधिक्रमण पाहावे लागेल. मायलर फिल्म दुर्बिणीला लावून अधिक्रमण दिसू शकते. एकंदर डोळ्यांची योग्य ती काळजी घेऊन निसर्गाचा हा आविष्कार पाहावा.

👦🏻🌺🌅👧🏻🌺🌅🌺
********************************
============================ 

No comments:

Post a Comment