महिला जगत

मदर तेरेसा : (२६ ऑगस्ट १९१० - ५ सप्टेंबर १९९७)  एक थोर मानवतावादी समाजसेविका. भारतात स्थायिक झालेल्या अँल्बेनियन महिला व शांततेच्या नोबेल पारितोषिकाची मानकरी. तेरेसाचे पूर्ण नाव अँग्निस गॉंकशा वाजकशियू. तिचा जन्म रोमन कॅथलिक अँल्बे-नियन कुटुंबात स्कॉपये (यूगोस्लाव्हिया) येथे झाला. तेरेसाचे वडील किराणामालाचे दुकानदार होते आणि आई शेतकर्‍याची मुलगी.    तिचे बालपण सुखात गेले. स्कॉपथे येथील सरकारी शाळेत शिक्षण घेत असताना ती सेवाकार्यांत रस घेत असे. अठराव्या वर्षी सिस्टर्स  ऑफ लॉरेटो या आयरिश संघात तिने प्रवेश केला. नंतर एक वर्ष  डब्लिन (आयर्लंड) येथे तिने इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. त्यानंतर   तिने जोगीण बनून पूर्णतः मिशनरी कार्यास वाहून घेतले. त्या कार्यानिमित्त ती भारतात कलकत्ता येथे लॉरेटो मिशनच्या सेंट मेरी हायस्कूलमध्ये भूगोल विषयाची अध्यापिका म्हणून रूजू झाली (१९२९).
स्पॅनिश योगिनी संत तेरेसाच्या नावाने तिचे नामान्तर झाले आणि पुढे मातृवत सेवाधर्मामुळे ती ‘मदर तेरेसा’ या नावाने ओळखली जाऊ लागली. तिने १९ वर्षे अध्यापन केले. ती प्राचार्य    झाली; अध्यापन करीत असताना शाळेजवळील मोती झील झोपडपट्टी-तील गरिबांच्या दीन जीवनाचे तिला अनेक वेळा दर्शन होत असे.  त्यामुळे तिच्या मनात अपंग, पददलित, शोषित, पीडित, दीनदुबळे इत्यादींची सेवा करावी, हे विचार येत. किंबहुना हीच ईशसेवा होय,   असे विचार तिच्यात दृढमूल झाले. एकदा  दार्जिलिंगला जात असताना ‘तू गरिबांच्या सेवेला लाग’ असा जणू दैवी संदेशच तिला मिळाला.  तेव्हा शैक्षणिक जबाबदारीतून मुक्त होऊन तिने केवळ निराश्रित व दीनदुबळे यांच्या सेवेस आमरण वाहून घेतले.
या कार्यासाठी तिने पोपची परवानगी मिळविली आणि कलकत्ता येथे मिशनरिज ऑफ चॅरिटी ही सेवाभावी संस्था स्थापन केली    (१९५०). पुढे या संस्थेचे रूपांतर संघात झाले. तिच्या विचारांशी सहमत असणार्‍या स्त्री-अनुयायीही कार्यकर्त्या म्हणून तिला लाभल्या. सुरूवातीस समाजातील उच्चभ्रू लोकांकडून तेरेसासह सेवाभावी महि- लांची खूप हेटाळणी व अवहेलना झाली. तेरेसाला तर लोक सेंट ऑफ द गटर्स म्हणत; तथापि या टीकेला न जुमानता तिने सेवाकार्य अखंड चालू ठेवले. विशेषतः मृत्युशय्येवरील व्यक्तीस अन्न, वस्त्र व निवारा या प्राथमिक गरजांबरोबर सहानुभूती, सांत्वन व प्रेम यांची नितांत गरज असते, हे तेरेसाने जाणले आणि इतरांनाही दाखवून    दिले. या संस्थेच्या जोगिणी गटारात, उकिरड्यात व इतरत्र टाकून दिलेल्या उपेक्षित मुलांचे मातृप्रेमाने संगोपन करू लागल्या. मुलांसाठी तिने स्वतंत्र अनाथ आश्रम काढले. तसेच बेवारशी, निर्वासित, निराश्रित व रोगीपीडित मरणोन्मुख व्यक्तींसाठी होम्स फॉर द डायिंग डेस्टिट्यूट्स (निर्मल हृदय) हे आधार आश्रम स्थापन केले (१९५२). १९६४ मध्ये तेरेसाने पश्चिम बंगालमध्ये कुष्ठगृहाची स्थापना केली. या लोकांची सेवा करण्यात ती स्वतःस कृतार्थ मानू लागली; कारण   त्यांची सेवा म्हणजे येशूचीच सेवा होय, अशी तिची धारणा आहे. ती स्वतःस ख्रिस्ताची विनम्र दासी मानत असे.
तिच्या कार्याचा कालानुरूप व्याप वाढला आणि कुष्ठरोग रूग्णालये, अनाथालये, महिला-अपंग-वृद्धांची आश्रमगृहे, फिरते दवाखाने, मरणोन्मुखांसाठी आधारगृहे, शाळा इ. विविध संस्था भारतात व भारतेतर देशांत पसरल्या. तेव्हा कार्यकर्त्यांची उणीव भासू लागली. या संस्थांत १९६२ पर्यंत फक्त सेविकांनाच प्रवेश होता; परंतु तेरेसाने मिशनरी ब्रदर्स ऑफ चॅरिटी ही वेगळी संघटना स्थापन करून पुरूष सेवकांना त्यात प्रवेश दिला. या संघात २,००० जोगिणी व ४०० ब्रदर्स कार्य करतात (१९८३).

विजयालक्ष्मी पंडित  : -
(१८ ऑगस्ट १९०० - १ डिसेंबर १९९० )भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्त्या व संयुक्त राष्ट्रसंघातील आमसभेच्या पहिल्या महिला तसेच पहिल्या आशियाई अध्यक्षा. त्यांचा जन्म सधन नेहरू कुटुंबात अलाहाबाद येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव स्वरूपकुमारी. वडील मोतीलालजी यांचा पाश्चात्य विचारांकडील कल व आई स्वरूपराणी यांची भारतीय संस्कृतीवरील निष्ठा यांच्या संमिश्र वातावरणात त्यांचे बालपण गेले. इंग्रजी अध्यापकांद्वारे घरीच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले.  काही काळ पुढील शिक्षणासाठी त्या स्वित्झर्लंडमध्ये होत्या. मोतीलाल व बंधू जवहरलाल हे रा ज का र णा त असल्यामुळे घरीच त्यांना राजकारणाचे धडे मिळाले. त्यांचा विवाह रणजित सीताराम पंडीत या मूळच्या महाराष्ट्रीय बॅरिस्टर बरोबर झाला (१९२१). रणजित पंडीत हे एक विद्वान व प्रसिद्ध वकील होते आणि नेहरू कुटुंबाशी संबंध आल्यानंतर ते राष्ट्रीय लढ्यात ओढले गेले . त्यांनी लग्‍नानंतर प्रथम कलकत्यास व पुढे अलाहाबाद येथे वकिली केली. त्यांनी मुद्राराक्षस, ऋतुसंहार व राजतरंगिणी या सस्कृत ग्रंथांचे भाषांतर केले. त्यांना चंद्रलेखा, नयनतारा आणि ऋतुविलासा या तीन मुली झाल्या. त्यांपैक नयनतारा सहगल लेखिक म्हणून प्रसिद्ध आहेत.
विजयलक्ष्मींच्या राजकीय जीवनास असहकाराच्या चळवळीपासून सुरुवात झाली. या चळवळीत त्या सहभागी झाल्या व त्यांना एक वर्षाचा कारावास भोगावा लागला. त्या अलाहाबाद नगरपालिकेत निवडून आल्या (१९३४). त्यानंतर त्यांनी त्यावेळच्या संयुक्त प्रांताच्या विधानसभेवर निवड झाली (१९३६) आणि लवकरच त्या स्थानिक स्वराज्य व आरोग्य खाते यांच्या पहिल्या महिलामंत्री झाल्या (१९३७); परंतु १९३९ मध्ये काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. यानंतर ‘छोडो भारत’ या आंदोलनास प्रारंभ झाला व त्यात त्यांनी भाग घेतल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली (१९४२). नादुरुस्त प्रकृतीच्या कारणाने त्यांची नऊ महिन्यानंतर सुटका करण्यात आली. या परिस्थितीतही १९४३ मध्ये त्यांनी बंगाल दुष्काळ निवारण्याच्या कार्यात भाग घेतला. १९४४ साली रणजित पंडितांचे दम्याच्या विकाराने निधन झाले. हा आघात फार मोठा होता; परिणामतः पुढील दोन वर्षे त्यांनी अमेरिकेत व्याखान दौरा काढला (१९४४-४६).
भारतात परत आल्यानंतर पुन्ही त्यांनी स्थानिक स्वराज्य व आरोग्य खाते यांचे मंत्रिपद अंगीकारले. तत्पूर्बी १९४०-४२ मध्ये त्यांना अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा होण्यांचा मान मिळाला होता. १९४६ मध्ये त्यांची संविधान समितीच्या सदस्या आणि संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधी मंडळाच्या नेत्या म्हणून निवड झाली. स्वातंत्र्योत्तरकाळात त्यांनी १९४७, १९४८, १९५२, १९५३ व १९६३ मध्ये संयुक्त राष्ट्रांत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. १९५३ मध्ये त्यांची आमसभेची अध्यक्षा म्हणून निवड झाली. रशिया (१९४९), अमेरिका (१९५१), ग्रेट ब्रिटन (१९५४-६२) इ. विविध देशांत भारताच्या राजदूत म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर त्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यपार होत्या (१९६२-६३). जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर फूलपूर मतदार संघातून त्या लोकसभेवर निवडून आल्या (१९६४). १९६७ च्या निवडणुकीतही त्या लोकसभेवर निवडून आल्या, मात्र त्यांनतर खासदारकीचा राजीनामा देऊन समाजकार्यास त्यांनी वाहून घेतले (१९६८). १९७७ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसविरोधी भूमिका घेऊन आणीबाणीवर कडक टीका केली; तथापि कोणतेही राजकीय पद स्वीकारले नाही.

No comments:

Post a Comment